वडसा (गडचिरोली):- देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील एका 35 वर्षीय इसमाचा गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील कसारी मार्गे तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार 9 डिसेंबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय शंकर करपते वय 35 वर्षे,रा.चोप,ता.देसाईगंज असे तलावात बुडून मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय करपते हे आज सकाळच्या सुमारास घरून कुऱ्हाड घेऊन गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगल परिसरात गेले होते. अशातच गावातील काही नागरिक जंगल परिसरात गेले असता, त्यांना गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील कसारी मार्गे असलेल्या पाटलीन तलावात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक इसम तरंगताना आढळून आला.
सदर इसम कुठलीही हालचाल करीत नसल्याने घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढून बघितले असता मृताची ओळख पटली. त्यानुसार देसाईगंज पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठवून मर्ग दाखल केला आहे.
संजय हा तलावाच्या पाळीवरून जात असतांना पाय घसरून तलावात पडला असावा; असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.संजय पश्चात तीन वर्षाचा मुलगा,पत्नी, व आई असा आप्त परिवार असून संजयच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.