गडचिरोली :-शहरापासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या कुरखेडा(चातगाव) येथील 25 वर्षीय गर्भवती महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज,शुक्रवार दिनांक:- 6 डिसेंबरला दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शारदा महेश मानकर ( Sharda Mahesh Mankar) वय - 25 वर्षे रा.कुरखेडा (चातगाव) ता.जि.गडचिरोली असे मृत गर्भवती महीलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,शारदा मानकर ही आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास गावालगत शेतबांधावर धानाचा खरा करण्यासाठी गेली होती. शेतालागतच जंगल परिसर लागून असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक शारदा हिच्यावर हल्ला चढवला. वाघाने सरळ नरडीला पकडल्याने तिने आरडा-ओरड केली. आरडा-ओरड करताच आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या महिलांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांनी धाव घेताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
मात्र,वाघाने शारदा मानकर हिच्या नरडीला पकडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली.घटनेची माहीती वनविभागाला कळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.शव उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोली रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतक महिला ही आठ महिन्याची गर्भवती होती.तर महीलेस ३ वर्षाचा मुलगा आहे.