वडसा : कोंढाळा येथील एका आठ वर्षीय मुलाचा गावालगत असलेल्या तलावात (गावतळा) बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार दिनांक-२० जुलैच्या सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.वंश विजय भुते वय ८ वर्षे, रा.कोंढाळा,ता.वडसा( देसाईगंज), जि.गडचिरोली असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,वंश भुते व घरा शेजारील तीन ते चार अल्पवयीन मुले आज दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या गावतळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते.काहीकाळ झाल्यानंतर सोबत असलेली मुले घरी परतली.वंश हा एकटाच तलावाजवळ होता.अशातच गावातील काही नागरिक सतत पडणाऱ्या पावसामुळे गावतळा पाण्याने किती भरलेला आहे; हे पाहण्याकरिता गेले असता,तलावात एक मुलगा तरंगतांना दिसून आला व तलावाजवळील पारीवर शालेय गणवेश आढळून आला.सदरची माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देण्यात आली.त्यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या मुलाला बाहेर काढले असता,त्याची ओळख पटली.पोलीस पाटील कुंभलवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता सदर घटनेची माहिती वडसा पोलीस ठाण्यास दिली.
वडसा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चौधरी,पोलीस हवालदार सतीश ठाकरे,मानकर व नंदेश्वर यांनी घटनास्थळ गाठून सदर घटनेचा पंचनामा करून मुलाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडसा ग्रामीण रुग्णलयामध्ये पाठविण्यात आले.पुढील तपास वडसा ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वडसा पोलीस प्रशासन करीत आहे.
वंश हा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकत होता.त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.