भद्रावती:- भद्रावती शहरातील गुरुनगर येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने सिलींग फॅनला दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता उघडकीस आली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. यथार्थ सुभाष भोयर वय पंधरा वर्षे राहणार गुरुनगर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
यथार्थ हा शहरातील सेंट ॲनस हायस्कूल सुमठाणा येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याची आई ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे पॅथॉलॉजिस्ट पदावर कार्यरत आहे तर वडील मेघे सावंगी येथे रुग्णालयात कार्यरत आहे. काल शाळेमध्ये कार्यक्रम असल्याने दुपारी १२ वाजता शाळेला सुट्टी झाली तो घरी आल्यानंतर त्याने घरातील सिलिंग फॅनला दुपट्टा बांधून गळफास घेतला. त्याची आई मध्यांतर सुट्टीनंतर घरी आली असता तिला हा प्रकार दिसला. तिने त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. १५ वर्षाच्या मुलाचे आत्महत्येचे कारण काय याचा तपास पोलीस करत आहे.