चंद्रपूर :- चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली आहे. जिल्ह्यातील गोळीबार झाल्याची ही दुसरी घटना होय. आज,रविवारी 7 जुलै रोजी सकाळी वस्त्र भांडारमध्ये आधी बॉम्ब फेकण्यात आला. त्यानंतर दुकानात प्रवेश करत गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले आहेत. तीन अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावून आले होते.
हल्लेखोरांकडून गोळीबार झाला तेव्हा एक गोळी या कर्मचाऱ्याच्या पायाला लागली आहे. कार्तिक साखरकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. चंद्रपूर शहरात गुरुवारी भरदुपारी एका अज्ञात इसमाने मनसे कामगारसेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली होती.ही घटना ताजी असतांनाच असा प्रकार घडल्याने बल्लारपूर शहरात झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,गांधी चौक परिसरात मोतीलाल मालू वस्त्र भांडार आहे.सकाळी दुकान उघडल्यानंतर काही वेळाने हा हल्ला झाला. याविरोधात व्यापाऱ्यांनी सध्या बल्लारपूर शहरातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक पुकारली आहे.दरम्यान,2 वर्षांपूर्वी मालू वस्त्र भांडार दुकानाला आग लावण्यात आली होती.त्यावेळी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र त्या आरोपीवर पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही.
तसेच या महिन्यात दुकानाचे मालक सुनील मालू यांना काही अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता.यामुळे सततच्या घटना पाहता मालू कुटुंबाने पोलिसांना सुरक्षेची मागणी केली होती.मात्र त्यांना सुरक्षा न मिळाळ्याने हल्लेखोरांची हिंमत वाढली असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिस तपास करीत आहे.
दरम्यान, दुकानात काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी महेंद्र खोब्रागडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार,तीन जण आले.त्यांनी बंदूक काढली होती.गोळीबार केला तेव्हा माझ्या सहकाऱ्याला गोळी लागली.तसेच तोडफोड केल्याचा आवाज आल्याने मी बाहेर गेलो.तेव्हा गाडीतून ३ जण आले होते.