वरोरा:- वरोरा तालुक्यातील आनंद वनात एका 24 वर्षीय तरुणीची प्रेम प्रकरणातून चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 24 तासात या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. आरती दिगंबर चंद्रवंशी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी समाधान माळी (रा.जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणाऱ्या वरोरा येथील आनंदवनातील आश्रमात मृत तरुणीचे आई-वडील राहत होते. त्यांच्यासोबत २४ वर्षीय आरती राहत होती. आई-वडिलांचा उपचार करतेवेळी आरतीचे प्रेम संबंध जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधान माळी या युवकासोबत जुळले. समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.
आनंदवनाच्या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सहा महिन्यापासून सुरू होते. मात्र त्यानंतर आरतीचे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. याची चाहूल समाधानला लागली. त्यामुळे दोघात वाद सुरू झाले. सहा महिने चाललेल्या प्रेमावरून दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला. आरतीचे आई-वडील बुधवारी (दि.२६) वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते. याबाबत समाधानला माहिती मिळाली. त्यानंतर त्याने आरतीच्या घरी जावून वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. यावेळी राग अनावर झाल्याने समाधानने सोबत आणलेल्या चाकूने आरतीच्या गळ्यावर, हातावर सपासप वार केले. अति रक्तस्त्राव झाल्याने आरती जागीच मृत्यू झाला.
आरतीचे आई-वडील रात्री ८ ते ८.३० दरम्यान घरी आले असता बाथरूम जवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडला होता. आरतीची हत्या झाली, ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. वरोरा पोलिसांना सूचना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करीत तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम व पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी याबाबत अधिक माहिती मिळवीत तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्स च्या आधारे २४ तासाच्या आत आरोपी समाधान माळी याला अटक केली.