वरोरा (चंद्रपूर) :- घरात तरुणी एकटी असताना गजबजलेल्या आनंदवनात बुधवारी भरदिवसा युवतीची निघृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवीत आरोपीला 24 तासांत अटक केल्याने या मागील सत्य समोर आले आहे.ही हत्या प्रेमप्रकरणातून करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
आनंदवनात दिगंबर चंद्रवंशी हे मागील अनेक वर्षांपासून पत्नी आणि मुलीसह वास्तव्याला आहेत. बुधवारी दिगंबर आणि त्यांची पत्नी दोघेही सेवाग्राम येथे सकाळीच निघून गेल्यामुळे आरती घरी एकटीच होती.दुपारी दिगंबरने आरतीला अनेकदा फोन केले असता तिचा दूरध्वनी बंद येत होता.त्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास ते दोघेही दिव्यांग पती-पत्नी घरी आले असता आरती स्नानगृहामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.याची माहिती पोलिसांना दिली.पोलिस घटनास्थळी गेले असता त्यांना आरतीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले.मात्र,त्या ठिकाणी शस्त्र आढळून आले नाही.आनंदवनसारख्या प्रसिद्ध सामाजिक संस्थेमध्ये हे कृत्य घडल्याने पोलिस चक्रावून गेले होते.मात्र,ह्युमन इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी आरोपीला २४ तासांत जेरबंद केले.
आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी एक वर्षापूर्वी आनंदवनात उपचाराला आला होता.सीतारातन रुग्णालयात काम करीत होता.याच दरम्यान दिगंबरकडे जाणे-येणे वाढल्याने त्याचा परिचय आरतीशी झाला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नाच्या आणाभाका सुरू झाल्या.मात्र, दरम्यानच्या काळात आरतीचा परिचय गोंदिया जिल्ह्यातील एका युवकाशी झाला आणि ती समाधानला टाळू लागली.याची माहिती समाधानला मिळताच दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले आणि समाधानने आरतीला संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपीने तीन महिन्यांपूर्वी एका ऑनलाइन साइटवरून चाकू बोलाविले.बुधवारी तिचे आई- वडील सेवाग्रामला गेल्याची संधी साधून त्याने आरतीला कायमचे संपविले.आरतीच्या मैत्रिणीने त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्दल पोलिसांना माहिती दिली. विशेष म्हणजे,हे निघृण कृत्य केल्यानंतर लगेच आरोपीने चक्क कौशल्य विकास परीक्षेचा पेपरही दिला.त्यानंतर गुरुवारी तो इतर सहकाऱ्यांसोबत नागपूरनजीक अशोकवन येथेही गेला होता.