ब्रम्हपुरी: मुडझा (टोली) येथील एका युवकाने कोसारा जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 3) उघडकीस आली. गौतम लोमेश भैसारे (27) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या - नसून हत्या असल्याची तक्रार कुटुंबाने ब्रम्हपुरी पोलिसांत दिली.
मृत गौतम भैसारे हा 15 एप्रिल 2024 रोजी काही व्यक्तींसोबत छत्तीसगड राज्यात तेंदूपत्ता पोते भराईसाठी गेला होता. तेथे आपसी वादातून त्याला मारहाण झाल्यानंतर त्याच्यासोबतचे व्यक्ती काम सोडून 23 एप्रिल रोजी गावाला परत आले. कामाचे नुकसान झाले म्हणून काहींनी गौतमला गावातच मारहाण केली.
तेव्हापासून गौतम बेपत्ता झाला, अशी तक्रार मृताचा लहान भाऊ अक्षया भैसारे याने ब्रम्हपुरी ठाण्यात केली होती. दरम्यान, अक्षय हा शनिवारी 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता कोसारा जंगल परिसरात कुड्याची फुले वेचण्यासाठी गेला असता गौतम भैसारे याचा मृतदेह गळफास लावल्याच्या स्थितीत आढळला.