राजुरा:- दोन अपत्य असतानाही घरगुती वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना आज दिनांक 26 मे रोजी सकाळी 10:30 वाजता राजुरा तालुक्यातील तुलाणा या गावात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
तुलाणा येथील अनिल सेलूरकर हा टेलरिंग कारागीर होता. त्याला दोन अपत्य आहे. सुखाचा संसार सुरू असतानाच त्याला दारूचं व्यसनही जडले होते. त्यातूनच बऱ्याचदा या दोघात नेहमी वाद होत होता. सध्या तेंदूपत्ता हंगाम असल्याने पत्नी तुळजाबाई सकाळीच गावातील काही महिलांसोबत तेंदुपाने आणण्यासाठी जंगलात गेली होती. इकडे पती अनिलचे मनात वेगळाच बेत होता, जंगलाच्या रस्त्यावर पत्नी तेंदूपत्ता घेऊन येत असताना गावाजवळ रत्यावरून तो तिच्यासोबत येत असताना पाठीमागून तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप चार वार करून ठार केले.
यावेळी गावातील एक महिला कोमल अलोने ही सुद्धा पत्नीसोबत होती. अनिल तिलाही मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती महिला धावत गावाजवळ तेंदुपत्ता संकलन करीत असलेल्या नागरिकांना दिसली असता नागरिक त्या महिलेच्या मदतीला धावून आले महिलेने सदर घटना सांगितली आणि लगेच विरुर पोलिसात माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपी पती हत्या करून विरुर पोलीस ठाण्यात जाऊन शरण आला. पोलिसांनी घटनेचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष वाकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे गायकवाड तपास करीत आहे.