नागपूर :- पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या संशयामुळे एक दिवसाच्या बाळाला फरशीवर आपटून त्याची हत्या करणाऱ्या नराधम बापाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.तसेच,दहा हजार रुपये दंड ठोठावला.न्यायाधीश गणेश देशमुख यांनी हा निर्णय दिला.सदर घटना मेडिकलमध्ये घडली होती.
गिरीश ऊर्फ श्रीकांत गोंडाणे वय ३२ वर्षे,असे आरोपीचे नाव असून तो सावर्डी,नांदगाव पेठ, अमरावती येथील रहिवासी आहे.त्याचा, पत्नी प्रतीक्षासोबत २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. दरम्यान,प्रतीक्षाला गर्भधारणा झाली.बाळंतपणाच्या वेळी तब्येत खालावल्यामुळे तिला नागपुरातील मेडिकलमध्ये हलविण्यात आले.तिने ३१ डिसेंबर २०२२ रोजी मुलाला जन्म दिला.आरोपी त्या दिवशी सायंकाळी ७ च्या सुमारास मेडिकलमध्ये गेला. त्याने प्रतीक्षासोबत भांडण केले व रागाच्या भरात तिच्या कुशीत झोपलेल्या मुलाला उचलून हवेत फिरवले आणि फरशीवर आपटले.त्यामुळे ते मुल जागेवरच मरण पावले.सुरक्षा गार्ड उत्तरा द्विवेदी यांनी इतरांच्या मदतीने आरोपीला पकडून अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले.सहायक पोलिस निरीक्षक आनंदकुमार खंडारे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध खटला दाखल केला.न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड.क्रांती शेख (नेवारे) यांनी कामकाज पाहिले.त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब व पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.