आलापल्ली: असे काय झाले की, त्याला टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करावी लागली हे कोडे आता पोलीसच उलगडणार असे चित्र दिसत आहे. मी आत्महत्या करत आहे, असा कॉल मित्रांना करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ एप्रिल रोजी रात्री येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन मोहुर्ले वय ३०, रा.रंगयापल्ली असे मृताचे नाव आहे. अहेरी येथील त्याची सासुरवाडी आहे. त्यामुळे तो अहेरीतच भाड्याने खोली घेऊन पत्नीसह राहत होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. दरम्यान, कौटुंबिक कारणावरून मोहन मोहुर्ले त्याचा पत्नीशी वाद होत असे. ७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता तो घराबाहेर पडला. गावालगतच्या शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळील एका झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
तत्पूर्वी त्याने एका मित्राला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला व तु कुठे आहेस असे विचारले असता मात्र त्याचे म्हणने न ऐकताच फोन कट केला मित्रांनी रात्री सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच आढळला नाही व आठ एप्रिल ला सकाळी महाविद्यालय जवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. मोहन मोहुर्ले याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.
आत्महत्येची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.