बल्लारपूर, (ता.प्र.): बल्लारपूर शहरातील पंडीत दिनदयाल वॉर्ड येथील रहिवासी लालबची रामअवध चौहान (वय 60 वर्ष) ही महिला पती रामअवध चौहान यांच्यासह कारवा जंगलात शेळ्या चराईसाठी गेली होती. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना आज 26 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.
वाघाने मृतक महिलेवर झडप घालून काही अंतर फरफटत नेले. दरम्यान पतीने आरडाओरड केल्याने वाघाने महिलेला तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. पत्नी जवळ जाऊन बघितले असता ती रक्ताच्या थारोळयात पडली होती.
दरम्यान कारवा रोडने जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती बल्लारशाह प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, यांना दिली. दरम्यान नरेश भोवरे यांनी अधिनस्त वनकर्मचाऱ्यांच्या सोबत तत्काळ मौकास्थळी हजर झाले
मौक्यावर पाहणी केली असता वाघाच्या हल्ल्यात लालबची रामअवध चौहान यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेऊन पोलिस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवून शवविच्छेदनासाठी पोलिस विभागाच्या ताब्यात दिले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकाला तात्पुरती सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी या भागात वाघाचा वावर असल्याने या भागात जाऊ नये, असे वारंवार सांगितले.