तुमसर:- (10 फेब्रुवारी ): भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. त्यामुळे या वाळूला मोठीं मागणी आहे. वाळू माफिया मिळेल त्या मार्गाने वाळूची अवैध वाहतूक करत आहेत. तुमसर तालुक्यातील तामसवाडी घाटातून वाळू चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टर वर नव्याने रुजू झालेले तहसीलदार मोहन टिकले व त्यांच्या पथकाने कारवाई केली.
तर प्रभारी उपविभागीय अधिकारी अनय नवंदर यांनी रॉयल्टी नसताना वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई केली. आयएएस असलेले प्रभारी उपविभागीय अधिकारी अनय नवंदर यांनी तुमसर तालुक्याचा दौरा केला. दरम्यान, तुमसर शहराबाहेरील सिहोरा रस्त्यावर चार वाळूचे टिप्पर त्यांना आढळले. त्यांनी सदर टिप्पर थांबवून रॉयल्टीची विचारणा केली. परंतु टिप्पर चालकाजवळ रॉयल्टी नव्हती. त्यामुळे चार ट्रकवर कारवाई केली. या कारवाई मुळे वाळू माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.