गडचिरोली: शहरातील चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कुल बाजूला असलेल्या विद्युत खांब वर काम करीत असतांना अचानक करंट लागून खाली कोसळून विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. जितेंद्र वसंतराव गजलवार (वय 35) रा. बोदली हिरापूर जि. चंद्रपूर असे मृतक विद्युत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कुल च्या नजीक असलेल्या विद्युत रोहीत्रावर चढून गजलवार हे काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाहाचा झटका लागण्याने ते डोक्याच्या भारावर खाली कोसळले, खाली कोसळताच डोक्याला गंभीर मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे. जितेंद्रच्या मृत्यू पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आईवडिलांना कमावता एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून त्याच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.