आरमोरी : कुटुंबियांना काहीही न सांगता घरातून निघून गेलेली १६ वर्षीय मुलगी सायंकाळी परतली नाही. सर्वत्र शोधाशोध व नातेवाइकांकडे चौकशी करूनही मुलगी सापडली नाही, त्यामुळे तिच्या वडिलांनी थेट आरमोरी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली.
आरमोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील इयत्ता अकरावीला शिकणारी अल्पवयीन मुलगी २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान घरच्यांना काहीही न सांगता घरातून निघून गेली. ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडील व नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती सापडली नाही. घरी परत येईल, या आशेवर कुटुंबियांनी चार दिवस प्रतीक्षा केली. मात्र मुलीचा शोध न लागल्याने अखेर वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फूस लाऊन पळवून नेले असल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलगी व अज्ञात आरोपी कुणाला सापडल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आरमोरी पोलिसांनी केले आहे.
तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी २८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
गावालगतचा मुलगाही गायब?
गायब झालेली अल्पवयीन मुलगी ही अकरावीला शिकत असून ती गावानजीकच्या शाळेत जाते. तिच्या गावालगतच्या एका गावातील मुलासोबत तिचे सूत जुळले होते, सदर प्रेमप्रकरणातून दोघेही गायब असल्याची खमंग चर्चा परिसरात आहे.