संगमनेर:- वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसांनंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संगमनेर शहरातील मनीषा दीपक कडणे (वय 25) असे मयत विवाहितेचे नाव असून गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात मैदानावर ही घटना घडली आहे. मनीषा या नेहमीप्रमाणे शुक्रवारी मैदानावर सरावासाठी आल्या होत्या. मैदानावर व्यवस्थित दोन राऊंड मारल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्रास होत असल्याने त्या खाली बसल्या आणि तिथेच जागेवर कोसळल्या. मनीषा या खाली कोसळल्याचे लक्षात येताच तिथे असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे.
सराव करतानाच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कडणे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. शहरातीलच एका अॅकेडमीअंतर्गंत त्यांचा सराव सुरू होता. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तालुक्यातील चंदनापूरी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.
मनीषा कडणे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विवाहितेच्या पश्यात लहान मुलगा, पती, सासू-सासरे असा संपूर्ण परिवार आहे. गेल्या काहि दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्यामुळं तरुणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात वाढ होत आहे. तरुणांच्या मृत्यूंचा हा आकडा चिंता वाढवणार आहे.