नागपूर : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यावर नागपूरमधील एका मुलाने त्याच्या मैत्रीणीवर वारंवार बलात्कार केला. नागपूरच्या सत्र न्यायालयाने फेसबुक फ्रेंडला कठोर शिक्षा सुनावण्यात दहा वर्षाचा सश्रम कारावास भोगण्याची शिक्षा दिली. आरोपी मुलावर तीन हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम जमा न केल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला.
आकाश गजानन टाले (२७) असे आरोपीचे नाव असून, तो मानवसेवानगर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १७ वर्षे ७ महिने वयाची होती. ती ब्यूटी पार्लरचे काम करीत होती. २०१८ मध्ये तिची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ते फुटाळा तलावाजवळ एकमेकांना भेटले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीवर प्रेम व्यक्त करून तिला लग्न करण्याचे वचन दिले.
काही दिवसांनी आरोपीने पीडित मुलीला मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. पुढे आरोपीने २०१९ पर्यंत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने मुलीसोबतचे संबंध तोडले. तिच्यासोबत बोलणे बंद केले. परिणामी, मुलीने १८ मे २०१९ रोजी आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.