गडचिरोली: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोह खाणीचे समर्थन केल्याचा आरोप करुन नक्षलवाद्यांनी गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. २३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ही थरारक घटना घडली. दरम्यान, घटनेनंतर नक्षल्यांनी तेथे पत्रक टाकले असून त्यात गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिस तसेच स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत.
लालसू वेलदा (६३, रा. टिटोळा ता. एटापल्ली) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे. हेडरी पोलिस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात हा थरार घडला. गाव पाटील लालसू वेलदा हे स्वतःच्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले. लालसू यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासमोरच हा थरार घडला. दरम्यान, या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जि.प. सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे.
हत्येनंतर घटनास्थळी पत्रक आढळले. त्यात सुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा माओवादी गडचिरोली डिव्हिजन कमेटीने केला आहे. यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
खाण समर्थकांना टोकाचा इशारा
आदिवासी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत तर हा आवाज दाबण्यासाठी काही लोक जनविरोधी काम करत आहेत. लवकर सुधरा अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत खाण समर्थकांना नक्षल्यांनी पत्रकातून इशारा दिला आहे.
मयत गाव पाटील यांचा मुलगा पोलिस
दरम्यान, हत्या झालेले लालसू वेलदा यांचा मुलगा पोलिस दलात कार्यरत आहे. जांभिया गावात अलीकडेच मोबाइल टॉवर उभारले असून ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. गावातील तरुणांना सुरजागड लोह खाणीत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन लालसू वेलदा यांनी अनेकांना खाणीच्या समर्थनार्थ वळवले होते. त्यामुळे त्यांना नक्षल्यांनी निशाणा बनविले, पत्रकात नक्षल्यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.
"एटापल्लीच्या हेडरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाव पाटलाच्या हत्येची घटना घडली आहे. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मारेकऱ्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत, योग्य तो तपास करण्यात येईल!"