गडचिरोली (Gadchiroli) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पिपली बुर्गी येथे भेट देऊन आदिवासी बांधव व जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी जिल्हा सोडताच पाठीमागे नक्षल्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने एका तरुणाची निर्घृण हत्या केली.
त्यानंतर पोटावर पत्रक ठेऊन पोबारा केला. १६ नोव्हेंबर रोजी भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे ही थरारक घटना उघडकीस आली. पोलिसांनी मात्र मृतक तरुण खबरी नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
दिनेश पुसू गावडे (२७) रा. लाहेरी ता. भामरागड असे मृत तरुणाचे नाव आहे. भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पेनगुंडा येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रुपेश हा लाहेरीवरून १५ नोव्हेंबर रोजी पेनगुंडा येथे गेला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्याच्या चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण असून हत्येनंतर घटनास्थळी त्याच्या पोटावर दगड ठेऊन त्याखाली एक पत्रक ठेवल्याचे आढळले. या पत्रकात दिनेश हा पोलिस खबरी असल्याचे नमूद आहे.
विशेष म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातून नक्षलवादी हद्दपार झाल्याचे म्हटले होते, परंतु त्याच दिवशी रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. पोलिसांनी गुरुवारी सकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भामरागड येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दिनेशने मारेकरी कोण, हत्येमागील नेमके कारण काय, या बाबी तपासात समोर येणार आहेत.