कोरची: कोरची ते बोटेकसा मार्गावर कोरचीपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिहीटेकला गावाजवळ एक ट्रक रस्त्याच्या खड्डयात मुख्य मार्गावर फसले आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प पडली होती. तर या मार्गावर महाराष्ट्रातून छत्तीसगडकडे जाणाऱ्या मोठमोठे शेकडो ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या.
कोरची-बोटेकसा या मार्गाने छत्तीसगड राज्यातील रायपूरवरून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील चंद्रपूरला अवजळ ट्रकाचे २४ तास वाहतूक सुरू राहते. या मार्गावरील डांबरीकरण रस्त्याची चाळण होऊन भीमपूर पासून बोटेकसापर्यंत रस्त्यावर मोठ-मोठे जीव घेणे खड्डे पडले आहेत. चंद्रपूरवरून माल घेऊन रायपूरला निघालेली ट्रक सकाळपासून बिहीटेकला गावाजवळ रस्त्याच्या मधोमध खड्डयात फसल्याने या मार्गावरील वाहतुकाची कोंडी निर्माण झाली आहे. ट्रकमध्ये माल भरून असल्याने खड्डयात फसल्यावर ट्रक दुसऱ्या बाजूला वाकले असून ट्रक उलटू नये म्हणून ट्रक चालकाने एका साईडला लाकडी पाट्यांची टेकणी लावून ठेवली आहे.
त्यामुळे चारचाकी व जड वाहने पुढे जाऊ शकत नाही तर पर्यायी म्हूणून दुचाकी चालक बाजूच्या शेतातील बांधीतून दुचाकीने प्रवास करत आहेत. याशिवाय ज्यांना ट्रकांचे जाम लागल्याची माहिती मिळाली असे वाहनचालक कोरची ते बेतकाठी- बोटेकसा या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केला आहे. उशिरा सायंकाळपर्यंत क्रेन बोलावून फसलेल्या ट्रकला रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे.