आरमोरी: तालुक्याच्या रामाळा व वैरागड परिसरात दोन वाघांची एन्ट्री झाल्याने वनविभाग खडबडून जागा झाला. रामाळा-वैरागड रस्त्यावरील जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने कोणतीही मनुष्यहानी होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने रामाळा ते वैरागड रस्त्यावर बरिकेटस लावून सायंकाळी ५ ते सकाळी ९ या कालावधीतील रहदारीसाठी रस्ता बंद केला.
रामाळा. वैरागड मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जंगल परिसरात दोन वाघांचा वावर आहे. या मार्गाने ये- जा करणाऱ्या नागरिकांना वाघांपासून धोका होऊ नये यासाठी या ठिकाणी वनविभागाने लोकांच्या माहितीसाठी बॅनर व पोस्टर लावले आहेत. या भागातील शेतात नागरिकांनी जाऊ नये यासाठी परिसरातील गावात वन विभागाने दवंडी दिली आहे. वडसा वनविभागाचे उपवसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संदीप भारती, परिविक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोग, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, आरमोरीचे क्षेत्र सहायक राजेंद्र कुंभारे व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
वन्यजीव सप्ताह सुरु झाला असून दरम्यान मानव-वन्यजीव संघर्ष टाळला जावा व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रामाळा-वैरागड मार्ग विशिष्ट कालावधीसाठी बंद ठेवला जात आहे.
ठाणेगावमार्गे प्रवास करा, शॉर्टकट टाळा
शॉर्टकट मार्ग म्हणून आरमोरी- रामाळा- वैरागड रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी चालते. वाघांचे हल्ले माणसांवर होऊ नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी आरमोरी- ठाणेगाव वैरागड मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन वन विभागाने केले