कुरखेडा, १३ सप्टेंबर : शाळेत जाणाऱ्या इयत्ता नववीच्या अल्पवयीन मुलीला आय लव्ह यू (I Love You) मी प्रेम करतो तुझ्यावर ,तू सुद्धा आमच्यावर प्रेम कर म्हणत छेड काढणाऱ्या दोन रोड रोमीयोना कुरखेडा पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी कुरखेडा शहरात घडली. त्यांना न्यायालयीन कोठडी सूनवल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. वैभव जांभूळकर (२२ व रेवनाथ दूधकुंवर (२२) दोघेही राहणार आंधळी, नवरगाव अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नववीत शिक्षण घेत आहे. शाळेत जात असतांना दोन तरुण तिचा दुचाकीने पाठलाग करत छेड काढत होते. मुलीने सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र दररोजचा त्रास सुरू आल्याने तिने याबाबत कुटुंबाला सांगितले व १२ सप्टेंबरला कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विनयभंग व बाललैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. शहरात अशाप्रकारचे रोडरोमीयो विद्यार्थिनींना त्रास देत असतात याचा नाहक त्रास विद्यार्थिनींना सोसावा लागत आहे. मात्र युवती आणि पालकांनी पुढाकार न घेतल्याने अनेक मजनूचा उपद्रव सुरू आहे. असे प्रकार घडत असल्यास वेळीच पोलिसांना सूचना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.