कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली. हा थरार मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. पहाटे ३ वाजताच्या सुमारास राहत यांचे वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आणि या घटनेची वाच्यता झाली.
पत्नीची हत्या केल्यानंतर राहत यांचा पती आरोपी तायमिन शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्याला लगेच अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते.
कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची
माहिती मिळाली आहे.