भंडारा: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे व मागणी असणारे धान तसेच अन्य पिकांसाठीचे बियाण्यांचे वाण कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांनी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले. आज सकाळी एकोडी, सेंदुर वाफा,येथील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्मार्ट प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने,आत्मा ,संचालक उर्मिला चिखले, तहसीलदार मयूर चौधरी, यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राची स्थापना 2002 च्या दरम्यान झाली असून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामार्फत संचलीत साकोली येथे कृषी विज्ञान केंद्र सोबत कृषी संशोधन केंद्र देखील आहे. या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याबाबत आणि सध्याच्या प्रकल्पांविषयी केंद्रप्रमुख तथा ज्येष्ठ वैज्ञानिक उषा डोंगरवार यांनी सादरीकरण केले.
यामध्ये कृषी विज्ञान केंद्राद्वारे करडई, जवस या तेल बियांच्या वाणाच्या पीक प्रात्यक्षिकांची माहिती व त्याबाबतच्या यशोगाथा जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्रकाशित करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत स्थानिक हवामान केंद्राच्या कार्याची विस्तृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. जिल्ह्यातील 1600 शेतकऱ्यांना हवामानाबाबतची माहिती व्हाट्सअपग्रुपद्वारे देण्यात येत असल्याचे श्रीमती डोंगरवार यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरातील विविध कृषी वाणाच्या जातींची माहिती श्री.कुंभेजकर यांनी घेतली.
यावेळी विषय तज्ञ प्रमोद पर्वते यांच्यासोबत योगेश महल्ले, डॉ.प्रशांत उंबरकर, डॉ.प्रवीण खिरारी ,कांचन तायडे ,कपिल गायकवाड हे कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
तत्पूर्वी एकोडी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या चेतन खेडेकर यांनी या कंपनीद्वारे 506 शेतकऱ्यांच्या क्लस्टरद्वारे जय श्रीराम या तांदळाचे उत्पादन व विक्री करण्यात येत असल्याची माहिती दिली. या कंपनीच्या वेअर हाऊस व राईस मिल शेडचे बांधकाम येत्या आठ महिन्यात कामकाज पूर्ण करण्याची सूचना श्री.कुंभेजकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीला केली.
त्यानंतर सेदूर वाफा येतील विदर्भ बळीराजा फार्मर प्रोडूसर कंपनीला देखील जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी या कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला.किन्ही येथील प्रयोगशील शेतकरी उमेश रहांगडाले यांच्या शेतातील धान पिकाच्या पट्टा पद्धतीची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी या दौऱ्यात घेतली.