नागपूर : ढगाळ वातावरणासह विदर्भात सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपात हजेरी लावणारा पाऊस पुढचा आठवडाभर असाच सक्रिय राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती व यवतमाळमध्ये पुढचे पाच दिवस, तर इतर जिल्ह्यांत पुढचे तीन दिवस यलाे अलर्ट जारी केला आहे.
मान्सूनने राजस्थानाहून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर ५ ऑक्टाेबरपर्यंत विदर्भासह महाराष्ट्रातून निराेप घेण्याचा अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातून पाय काढेपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी, तर त्यानंतर ३ ऑक्टाेबरपर्यंत अनेक ठिकाणी मध्यम ते जाेराचा पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. भंडारा, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत हीच स्थिती राहील, तर चंद्रपूर, गडचिराेली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत गुरुवारपासून पावसाला जाेर राहील, असा अंदाज आहे. या काळात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्यासह कृषी विभागानेही दिला आहे.
पावसाची सक्रियता वाढली :
दरम्यान, मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची सक्रियता वाढली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यवतमाळमध्ये सर्वाधिक ४४ मि.मी. पाऊस झाला. यासह मूर्तिजापूर, अंजनगाव सुर्जी, भंडारा-पवनी, संग्रमापूर, सिंदेवाही, काेरची, सडक अर्जुनी, मंगरूळपीर अशा सर्व जिल्ह्यांत पावसाने किरकाेळ हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे तापमान अंशत: कमी झाल्याचे जाणवत आहे.