चंद्रपूर:- अतिक्रमणाच्या वादात मृतदेहावरील अंत्यसंस्कार अडकल्याची गंभीर घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलीय. कोरपना तालुक्यातील नवेगावमधील घटनेने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झालीय. एकीकडे देश जगातील तिसरी महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहे. पण गावामध्ये मूलभूत सोयी-सुविधा नसल्याचं चित्र आहे.
नवेगाव येथे सरस्वती लक्ष्मण कातकर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबियांसमोर वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला. गावात स्मशानभूमी नसल्यानं गावकऱ्यांनी प्रशासनाकडे गायरान जमिनीवर अंत्यसंस्काराची परवानगी मागितली. मात्र या गायरान जमिनीवर अतिक्रमित शेती आहे. महादेव गोरे या शेतकऱ्याला पट्टेवाटप झाले आहे. महादेव यांनी त्यांच्या शेतजमिनीवर अंत्यसंस्कार करू देण्यास नकार दिला. दरम्यान तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी अतिक्रमण झालेल्या गायरान जमिनीवरील काही जागा स्मशानभूमीला देण्याचा आदेश जारी केलाय. तरीही अतिक्रमणधारक शेतकरी महादेव गोरे आणि त्यांच्या परिवाराने त्या जागेवर प्रेतला अग्निदाह करू देण्यास विरोध केला. यात महादेव गोरे आणि गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला.
शेतकरी महादेव गोरे यांचा जागा देण्यास विरोध होता. त्याच जागेवर अंत्यसंस्कार करू द्यावा असा आग्रह गावकऱ्यांनी धरला. यामुळे वाद निर्माण झाला. यामुळे मृतदेह अंत्यसंस्काराविना गावातच परत आणला. अंत्यसंस्कार करण्यास जागा नसल्यानं नागरिकांनी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना रोखून धरले. अखेर गावाचे सरपंच याकामी पुढे आले. मृतदेह कुजू लागल्याने सर्वांच्या सहमतीने सरपंचाच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आला.