चंद्रपूर : ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २० दिवसापासून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाची आज अखेर 30सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर काल (दिनांक 29 सप्टेंबर )ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,ओबीसी मंत्री अतुल सावे, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री छगनराव भुजबळ मुख्य सचिव , प्रधान सचिव ,ओबीसी खात्यांचे सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले. पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित होणार आहे. त्यामुळे सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी समाज व मराठा समाज यांच्यातील सौहार्द जपण्याचे काम राज्य सरकार करेल, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू दिल्या जाणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्या जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आंदोलनाची सांगता करताना यावेळी आंदोलन स्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार बंटी भांगडिया, माजी मंत्री परीणय फुके, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, एड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. संजय घाटे, सूर्यकांत खनके, डॉ अशोक जीवतोडे,डॉ. दिलीप कांबडे , पप्पू देशमुख, संध्या गुरूनुले, राजेश नायडू सतीश भिवगडे , वैभव सिरसागर नंदू टोंगे, श्याम लोडे, नंदू नागरकर, मनीषा बोबडे,गोमती पाचभाई, कुसुमताई उदार, अनिल शिंदे, अनिल डहाके, डॉ किशोर जेणेकर , दिनेश कष्टी, पंडित पारोधे, गणेश आवारी राजेश बेले, देवा पाचभाई, महेश खगार, अक्षय येरगुडे, इत्यादी राष्ट्रीय ओबीसी महासंग, ओबीसी संघटना, जातीय संघटनांचे आंदोलनकर्ते उपस्थित होते.
शनिवार (दि.३०) ला सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण निंबुपाणी पाजून संपविले. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात आले.
राज्य शासनाने सकारात्मकरीत्या ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात दिलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत करतो.शासनाने मागण्या मंजूर केल्या असून त्याची तातडीने अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा ठेवतो परंतु याची अंमलबजावणी न झाल्यास आम्ही आंदोलनाचा पवित्रा कायम ठेऊ -सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ*