गोंदिया : करिअर झोन शिकवणी वर्गात शिकणारे चार विद्यार्थी पांगोली नदीत आंघोळीसाठी गेले होते. त्यापैकी एकाचा रेल्वे पुलाखाली बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. यशराज धीरेंद्रसिंग रघुवंशी (17, रा. अवंती चौक, गोंदिया) असे मृताचे नाव आहे.
जिल्ह्यात गेल्या सहा-सात दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. नद्या, नाले तुंबले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील करिअर झोनमध्ये शिकणारे चार विद्यार्थी पांगोली नदीच्या छोटा गोंदिया परिसरातील रेल्वे पुलाखालील नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते. यशराज धीरेंद्रसिंग रघुवंशी हे मित्रांसोबत आंघोळ करत असताना त्यांचा तोल गेल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा आपत्ती व बचाव पथक तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. सायंकाळपर्यंत पथक शोध घेत होते. मात्र यशराज अद्याप सापडलेला नाही. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा शोध घेण्यात येणार आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.