चंद्रपुर:- तालुक्यातील खानाबाद व ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा वन परिसरात चवताळलेल्या एका हत्तीने प्रवेश केल्याच्या माहितीने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली आहे. सावली व ब्रह्मपुरी वन विभागाच्या पथकाने संयुक्त शोधमोहीम राबवली.मात्र हत्ती कुठेही आढळून आला नाही. मात्र, ज्या मार्गाने हत्ती गेला, त्याच्या पायांचे ठसे वन विभागाला आढळले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील वन विभागाच्या २८८ क्रमांकाच्या वनक्षेत्रात त्या हत्तीने काही काळ विश्रांती घेतल्याची चिन्हे दिसून आल्याची नागरिकांत चर्चा आहे. हत्तीच्या पावलांच्या ठशावरून सिंदेवाही तालुक्यातील जंगलाच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सावली व ब्रह्मपुरी वन विभागाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवून जंगल परिसर पिंजून काढण्यात आला; परंतु हत्तीच्या पाऊल खुणांशिवाय वन विभागाच्या काहीच हाती लागले नाही. वन विभाग पुन्हा शोध मोहीम राबवणार असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा:
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी जंगलात परिसरातून ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगावमार्गे मुडझा परिसरात राहून तो ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
हत्ती सावली जंगलात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, कुठेही पत्ता लागला नाही. हत्तीच्या पावलांचे ठसे आढळले आहेत.
- प्रवीण विरूटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली