तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा पोलीस एका बेपत्ता व्यक्तीचा तपास करताना पोलिसांना एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद रीतीने शुक्रवारला वावरतांना आढळली. तिला ताब्यात घेतले असता पोलिसांना वरोडा शहरात देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून यांचा भांडाफोड केला.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी शहरात संशयास्पदरित्या वावरतांना आढळली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिला एका व्यक्तीने ग्राहकाला भेटण्याकरिता पाठविल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी लगेच सूत्रे हलवली आणि तिच्याकडून व्यवसाय करून घेणाऱ्या एका २२ वर्षीय महिलेला तसेच यातील एका पुरुष एजंटलाही पोलिसांनी ताब्यात घेताच त्यांनी ग्राहकांची नावे सांगितली. यावरून पोलिसांनी ९ व्यक्तींना अटक केली असून यातील एक ग्राहक हा बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे.
हे देखील वाचा:
|महापूर ओसरला...मग आरोग्याची झटपट काळजी घ्या नाहीतर....
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, यातील सर्व ग्राहक आणि आरोपींचा पंचनामा सुरू असून त्याच्यावर बलात्कार, बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पिटा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात एका घटनेमध्ये त्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची ही बाब समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची रवानगी बाल सुधार गृहात केली असून यातील आरोपी महिला, एजन्ट आणि ग्राहकांची चौकशी करण्याकरीता आठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे नोपाणी यांनी सांगितले. शहरात काही पॉश भागात सुद्धा देह व्यापार चालतो अशी चर्चा शहरात आहे.