गडचिरोली, ता. 11 : अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्यास 5 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरमोरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक प्रकाश हनुमंत जाधव (39) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या इसमावर आरमोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या अनुषंगाने त्याची मोटारसायकल जप्त न करणे व त्याला अटक न करण्यासाठी पोलिस नाईक प्रकाश जाधव याने त्यास 5 हजार रुपयांची लाच मागितली.
परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज आरमोरी पोलिस ठाणे परिसरात सापळा रचला असता पोलिस नाईक प्रकाश जाधव याने तक्रारकर्त्यास 5 हजारांची लाच मागितल्याचे पंचांसमक्ष स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे व अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार नत्थू धोटे, पोलिस नाईक किशोर जौंजाळकर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी ही कारवाई केली.