चंद्रपूर, दि.24: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पंडित दिनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद काटकर असतील. या मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्विसेस, चंद्रपूरमार्फत मेडिकल सर्वेअर, टॅलेनसेतू सर्विसेस प्रा. लि. पुणेमार्फत लाईन ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, स्वातंत्र मायक्रोफाइन प्रा. लि. बल्लारपूरमार्फत फिल्ड ऑफिसर, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीमार्फत इन्शुरन्स ॲडव्हायझर, सेल्स ट्रेनी, एल.आय.सी वरोरामार्फत इन्शुरन्स ॲडव्हायझर आदी कंपनीमार्फत विविध पदे रोजगार मेळाव्यात भरण्यात येईल. कंपन्यांकडे सद्यस्थितीत एकूण 535 जागा असल्याचे कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे.
उमेदवारांनी आधारकार्ड, शैक्षणिक अहर्तेचे प्रमाणपत्रासह सदर मेळावा कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या मेळाव्यात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त महिला उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.