अहेरी सुरजागड लोह 1- प्रकल्पातून खनिजाची वाहतुक करणारे ट्रक चालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने सुरू असलेला अपघाताचा सिलसिला कायम असुन काल सायंकाळी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एक इसम ट्रकखाली सापडून तो जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. प्रदिप पातर (३०) असे मृतकाचे नांव आहे.
प्राप्त माहितीनुसार बोरी रामपूर येथील गूडू नामक इसम यांचे लगाम येथे दूकान असून संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान आपले दूकान बंद करून आपल्या दोन नौकरा सोबत लगाम येथून
येत असताना प्रदिप पातर हा ट्रकच्या खाली येवून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सूरजागढ खाणीतून खनिजाची वाहतुक करणारे ट्रक बेदरकारपणे वाहने चालवित असल्याने रस्त्यावरून आवागमन करणाऱ्या नागरीकामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावित अशी मागणी केली जात आहे.
एटापल्ली ते आलापल्ली- आष्टी- कोनसरी- चामोर्शी पर्यंत च्या मार्गावर सुरजागड प्रकल्पाच्या वाहनांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे ही वाहने मृत्यूचा सापळा ठरत आहेत.