चंद्रपूर : झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालून पत्नीच्या डोळ्यादेखत फरफटत नेत तिच्या पतीची शिकार केली. चिमूर तालुक्यातील सावरगाव पासून सुमारे एक किमी. अंतरावरील शेतात काम करणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर झुडपात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.
सदर थरारक घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील बोडधा बिटात घडली. ईश्वर गोविंदा कुंभारे (४५) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्यांची वाघाने झोप उडविली आहे.
माहितीनुसार सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात धान पऱ्हे, पऱ्हाटी, सोयाबीन आदींची लागवड केली आहे. यामुळे दररोज शेतकरी शेताकडे जात आहे. सावरगावपासून एक किमी अंतरावर तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या बोडधा बिटातील नेरी वनक्षेत्रातील पांधरा बोडी शेतशिवारात ईश्वर कुंभारे हे पत्नीसह शेतात कामासाठी गेले होते. ईश्वर हे शेतात काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवून झुडपात ओढत नेऊन ठार केले.
डोळ्यादेखत घडलेला हा प्रकार पाहून ईश्वरच्या पत्नीने आरडाओरड केली. परिसरातील शेतकरी धावून आले. गावालगत शेत असल्यामुळे गावकरीही आले. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, चंद्रकात रासेकर व वनरक्षक उपस्थित होते.