चंद्रपूर: सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील १५ जून २०२३ रोजी रघुनाथ नारायण गुरनुले, रा. नवेगांव (लोन) यांना वनविकास महामंडळाचे कक्ष क्रमांक १७२ मध्ये FL-२ या नर वाघाने हल्ला करून ठार केले होते. शिवाय, FL-२ वाघाचे सदर परिसरातील वास्तव्य कायम असल्याने सरडपार, नवेगांव लोन, चिटकी व जाटलापूर या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करित असल्याच्या बऱ्याच वनविभागाकडे तक्रारी होत्या. त्यामुळे वनविभागाकडून सदर वाघाचे संनियंत्रण करण्याची कार्यवाही सुरू होती. अखेर वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. FL-२ या नर वाघाची रस्त्याने आवागमन करणा-या नागरिकांवर धावून हल्ला करण्याची प्रवृत्ती पाहता व सदर वाघामुळे भविष्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आज १८ जुलै २०२३ रोजी सदरील FL-२ वाघ (नर) याला सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र-सिंदेवाही मधील कक्ष क्रमांक १२८१मध्ये दुपारी १२.५० वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर तथा प्रमुख RRT व श्री अजय मराठे, शुटर, RRT सदस्य यांनी डार्ट करून तो बेशुध्द झाल्यावर त्यास त्यांचे चमुचे सहाय्याने १.३५ वाजता पिंजराबंद केले.
सदरची कार्यवाही एम.बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी, व्ही.ए. सालकर, वनक्षेत्रपाल (प्रा.) सिंदेवाही, वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी, तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य ए.डी. कोरपे, ए.एम. दांडेकर, नुर सैयद व राकेश अहुजा (फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली.
जेरबंद करण्यात आलेल्या FL-२ वाघ (नर) चे वय अंदाजे तीन ते चार वर्षे असून सदर वाघाची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र, नागपूर येथे हलविण्यात येईल असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात येते.