- आजपासून घरोघरी बीएलओव्दारे मतदार पडताळणी
भंडारा दि.21: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत पूर्व –पुनरीक्षण उपक्रमामध्ये आजपासून ते 21 ऑगस्ट या महीन्याभराच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे घरोघरी जावून मतदार यादी तपासून घेत आहेत.त्यामध्ये नवमतदारांची नोंदणी तसेच मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदाराबाबत संबंधिताकडून फॉर्म न.7 भरून घेण्याची प्रक्रीया करत आहेत.
आज गुंजेपार येथे जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी याबाबतीत चंद्रशेखर बांते यांच्या घरी जाऊन मतदारांची पडताळणी करत असलेल्या प्रक्रीयेची माहिती घेतली.यावेळी भंडारा तहसीलदार श्री. सोनकुसरे,तसेच तलाठी गणेश काळे,सुषमा ईडपाते तसेच बीएलओ श्रीमती भांडारकर यांनी आयोगाच्या निर्देशानूसार मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याचे सांगितले.मयत व्यक्तींच्या नावांची यादी ग्रामसेवकांनी बीएलओना उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिका-यांनी केली.
खुर्शीपारमध्ये येथील मतदार पडताळणीचे काम तहसीलदार श्री.सोनकुसरे यांनी घरोघरी जावून केले.तेथील नागरिकांच्या घरी जावून मतदारांची नावे मतदार यादीत असल्याची पडताळणी त्यांनी केली.या उपक्रमामुळे जिल्हयातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचे आणि अद्ययावतीकरणाचे काम सुलभ होऊ शकणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
आज भंडारा जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार तसेच गावपातळीवरील यंत्रणांनी या मतदार पडताळणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली.