चंद्रपूर:- सहावर्षीय चिमुरडीवर दोन अज्ञात इसमांनी एका निर्जन घरी नेऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन दोन अज्ञात इसमावर पोक्सो व कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी पीडितेची आई मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. यावेळी तिची सहा वर्षीय लहान मुलगी घरी होती. मोठ्या मुलीला शाळेत सोडून आल्यानंतर लहान मुलगी घरी आढळून आली नाही. तिने तिचा सर्वत्र शोध घेतला असता घरापासून अडीच किमी अंतरावरील वेकोलि मार्गाकडे ती मुलगी आढळून आली. सायंकाळी त्या मुलीने आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. त्यामुळे तिने तिला एका खासगी रुग्णालयात नेले, तपासणी केली असता गुप्तांगावर काही व्रण आढळून आले. आईने मुलीची विचारणा केली असता, मी सायकलने जात असताना मोटारसायकलने आलेल्या दोघांनी मला एका घरी नेऊन अत्याचार केल्याची माहिती दिली.
पीडित मुलीच्या आईने दुर्गापूर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोघांवर कलम ३७६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलिस स्टेशनचे पोलिस अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.