चंद्रपूर:-यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील शेख कुटुंबाचा चंद्रपूरात झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त शेख कुटुंब राजुरा येथून कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासावर निघाले होते.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. शेख कुटुंब आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 29, बी. सी.6321 ने घुग्गुस जवळ पोहचले असता वाहन अनियंत्रित झाले. चारचाकी बोलेरो वाहनाने दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बोलेरो वाहनाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
या भीषण अपघातात शेख कुटुंबातील रफीक नबी वस्ताद शेख, पत्नी संजिदा रफीक शेख , युसूफ नबी वस्ताद शेख, पत्नी मुमताज युसूफ शेख हे जागीच ठार झाले. मृतदेह काढताना सुद्धा पोलीस व वाहतूक प्रशासनाला अनेक समस्येचा सामना करावा लागला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटरचा उपयोग करावा लागला.