चामोर्शी:- तालुक्यातील आष्टी येथे आलापल्ली चंद्रपूर मार्गावर वनविभागाच्या तपासणी नाक्या समोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 14 मे रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सोनाक्षी मसराम वय 12 वर्ष असे मृतक मुलीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, सोनाक्षी आपल्या मामासोबत दुचाकी क्रमांक MH 34 AZ 9575 ने आष्टीवरून गोंडपिपरी कडे जातांना वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर दुचाकी घसरली यात दुचाकीवरुन मृतक मुलगी आणि तिचा मामा खाली पडले एवढ्यात मागून बल्लारशाकडे लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली मृतक मुलगी चिरडल्या गेली यात तिचा जागीच मृत्यु झाला.
सदर घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. घटनेची माहिती होताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह उचलून शवविछेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.