पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त (Fear free and copy free) वातावरणात व्हावे. यासाठी धडपड सुरु करण्यात आलेली आहे. त्यादृष्टीने कॉपीमुक्त अभियानाची बैठकही झाली.
यंदा इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान, तर इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्याचे ऑनलाइन प्रवेशपत्रही उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. विभागनिहाय बैठकांचे सत्रही सुरू झालेले आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याकरीता दृकश्राव्य पद्धतीने नुकतीच बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीस पोलीस महासंचालक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य मंडळ अध्यक्ष, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय मंडळ अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी आदी सहभागी झाले होते.
राज्यभरातील परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाकडून भरारी व बैठी पथके नियुक्त करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळल्यास करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतच्या सूचना आधीच माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.