चंद्रपूर: आज दिनांक ३० डिसेंबर रोजी मौजा इरव्हा येथील महिला आपल्या शेतामध्ये करत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जागीच ठार केले. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव नर्मदा भोयर वर्ष राहणार इरव्हा असे आहे.
सविस्तर वृतांत - नागभीड:- शेतावर गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना नागभीड तालुक्यातील इरव्हा (टेकरी) येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने नागभीड तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
नर्मदा प्रकाश भोयर (५०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. नर्मदा शुक्रवारी सकाळी मुलगा, सून आणि गावातील इतर महिलांसमवेत घरच्या गुरांसाठी गवत आणण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. शेताच्या बांधावर गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात त्या जागीच गतप्राण झाल्या. काहीवेळाने सून, मुलगा व इतर महिलांनी नर्मदा यांना आवाज दिला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून नर्मदा ज्या ठिकाणी गवत कापत होत्या त्या ठिकाणी जाऊन बघितले असता, वाघ नर्मदाच्या नरडीचा घोट घेत असल्याचे निदर्शनास आले. बघायला गेलेल्यांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला.
दरम्यान, घटनास्थळापासून गाव जवळच असल्याने ही वार्ता लगेच गावात पोहोचली आणि बघ्यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती नागभीडच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.