- 2 हजार ६०० रुपयाचा दंड वसूल
वर्धा: तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाने सावंगी मेघे येथे दवाखान्यासमोरील विविध टपरींवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ.नम्रता सलुजा, मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार, अमित तुपकाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नायक जितेश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर अनेत प्रकारचे दुष्परिणाम होतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, हृदयविकास, कॅन्सरसारखे आजार हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे होत असतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो जो शरीराला हानिकारक ठरतो. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण हे लहान मुलांमध्ये वाढत आहे.
तंबाखू नियंत्रण कायदा २००३ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच २९ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सूपारी, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास व थुंकन्यास आणि धुम्रपान करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी कळविले आहे.