गोसीखुर्द प्रकल्पामुळे ३४ गावे पूर्णतः व ७० गावे अंशतः गावठाण बाधित होतात. याव्यतिरिक्त वैनगंगा नदीच्या काठावरील २६ गावठाणातील गावांना गोसीखुर्दच्या जलपातळीमुळे जोखीम पत्करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या २६ गावांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, लाभक्षेत्र विकास मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
२६ गावांनी पुनर्वसनाची मागणी
गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. २६ गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी या संदर्भात आयाजित बैठकीत दिले.
भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू
मंत्रालयात आज भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते. भंडारा रोड ते भंडारा शहर मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेलमार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.