राजुरा:- रविवारला मौजमस्ती करण्यासाठी डोंगरगाव सिंचन प्रकल्पाच्या कालव्यात पोहणे चांगलेच अंगलट आले आहे. पोहण्यासाठी उतरलेले चार मित्र पाण्यात बुडू लागले. यातील तिघांना वाचविण्यात यश आले. मात्र एकाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर जिल्यातील राजूरा तालुक्यातील डोंगरगाव सिंचन प्रकल्पातील कालव्यात आज दुपारी 3:30 वाजताच्या घडली. रूपेश खंडेराव कुळसंगे असे मृतकाचे नाव आहे. तर या घटनेत एकाची प्रकृती गंभीर झाली आहे.
प्राप्त माहीतीनुसार, राजूरा तालुक्यातील डोंगरगाव सिंचन प्रकल्पाचा कालव्यात टेंबूर्वाही या गावातील सहा ते सात तरूण मुलं पोहण्यासाठी गेले. यापैकी चार मुलं पाण्यात बुडू लागले. त्यापैकी तीन मुलांना बाहेर काढण्यात त्यांच्या मित्रांना यश आले. मात्र रूपेश खंडेराव कुळसंगे (वय 23) या यूवकाचा पाण्यात बुडल्याने दुदैवी मृत्यू झाला. तर पाण्यातून बाहेर काढण्यात आलेला दुसरा तरूण मनोज रामा बावणे (वय 22) याची प्रकृती खालावली आहे. त्याला उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालय राजूरा येथे हलविण्यात आले.
घटनेची माहीती मिळताच लगेच विरूर पोलीसांनी घटनास्थळ गाठले. सहायक पोलीस निरीक्षक राहूल चव्हाण यांच्या मार्गदर्नाखाली पुढील तपास हवालदार भुजंगराव कुळसंगे, माणिक वाग्धरकर, विजय मुंडे, अतुल चाहरे, अशोक मडावी करीत आहेत. या घटनेने टेंबुर्वाही गावात शोककळा पसरली आहे.