भंडारा : घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या महिलेवर तिघांनी सामूहिक अत्याचार ( women gang-raped by three people ) केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या (Kardha Police Station ) हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेला या अत्याचारामुळे प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दिल्लीतील "निर्भया" प्रकरणासारखी ही घटना असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती ३० जुलैला घरगुती वादातून एकटीच माहेरी जाण्यासाठी निघाली. वाटेत तिला श्रीराम उरकुडे (वय ४५) भेटला. त्याने तिला चारचाकीने घरी सोडतो असे सांगितले. मात्र, तिला घरी न नेता मुंडीपार (जि. गोंदिया) या गावाजवळ नेले व रात्री तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता. ३१) पळसगाव रस्त्यालगत पुन्हा त्याने तिच्यावर अत्याचार केला व जंगलात सोडून दिले. सोमवारी (ता. १) घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांनी शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडिता बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात व नंतर नागपुरात शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पुन्हा "निर्भया"
कारधा पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी मेडिकल कॉलेज, नागपूर येथे दाखल केले. रक्तस्राव थांबत नसल्याने डॉक्टरांनी तिच्यावर कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया केली. ही घटना निर्भया प्रकरणासारखी भयानक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आवश्यक नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.