राजूरा (चंद्रपूर) : रेल्वेने धडक दिल्याने वाघाचे दोन तुकडे पडल्याची घटना जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात घडली. बल्हारपूर ते काझीपेठ या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गातील चनाखा ते विहिरगाव दरम्यान ही घटना आज घडली. या मार्गावर अनेकदा रेल्वेचा धडकेत वन्यजीवांचा मृत्यू झालेला आहे.
रेल्वे विभागाचा गँगमन नेहमीप्रमाणे रेल्वे ट्रक तपासणी करीत जात होता. चनाखा ते विहिरगाव मार्गावरील दृश्य बघून तो हादरला. कक्ष क्रमांक 160 मधील रेल्वे रुळालगत वाघ ठार झाल्याचे त्याला दिसून आले. लगेच त्यांने रेल्वे स्टेशन प्रमुखाना घटनेची माहिती दिली. घटनेची माहीती मिळताच राजुरा वनविभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा केला आणि वरिष्ठ वन अधिकार्याना घटनेची माहिती दिली. या रेल्वे मार्गात आतापर्यंत वाघ, अस्वल, चितळ या १ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. सतत घडणाऱ्या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.