प्रतिनिधी / गडचिराेली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे जी-मेल खाते हॅक करून त्यांच्या संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे अनाेळखी 'व्हॉट्सॲप' क्रमांकावरून कुलगुरूंचे नाव व फाेटाेचा साेशल मिडीयावर गैरवापर करण्यात आला. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात सर्वत्र वाढ झालेली असताना अज्ञात भामट्यांनी थेट गडचिराेली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनाच लक्ष्य केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. अज्ञात भामट्यांनी कुलगुरूंचे जीमेल खाते हॅक केले. त्यातून संबंधितांचे दूरध्वनी क्रमांक चोरून कुलगुरूंचे छायाचित्र असलेल्या 'व्हॉट्सॲप' क्रमांकावरून सर्वांना एक 'लिंक' पाठविली. त्यात 'ॲमेझॉन'च्या कूपनसंदर्भात माहिती समाविष्ट करा, अशी विनंती करण्यात आली होती.
सदर बाब लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ नाेटीस काढून अज्ञात हॉट्सॲप' क्रमांकावरून येणाऱ्या संदेशाला प्रतिसाद देवू नये, पाठविलेली लिंक ओपन करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच पाेलीस विभागाच्या सायबर सेल शाखेत तक्रार करण्यात आली असल्याची माहीती कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या स्वियसहायकांनी दिली.