चंद्रपुर :- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील खांडला गावातील एक महिला शेळ्या चारायला जंगलात गेली असता तिच्या मागून पट्टेदार वाघ आला. जिवाच्या आकांताने महिलेने चक्क जवळच्या नाल्यात उडी मारत आपला जीव वाचविला. दरम्यान, वाघाने बकरीला ठार केले. ही घटना रविवारी घडली.
सिंदेवाही तालुक्यातील वनउपक्षेत्र नवरगाव अंतर्गत रत्नापूर बिटातील खांडला येथील येथील मीनाक्षी विजय धुर्वे (३०) ही रविवारी सकाळी आपल्याकडील दोन बकऱ्यांना कळपात पोहोचण्यासाठी घेऊन गेली. दरम्यान, खडकाळ नाल्याजवळ पोहोचताच पट्टेदार वाघ तिच्या पाठीमागून येत असल्याचे तिला दिसले. समोर खडकाळ नाल्याचे पाणी आणि पंधरा-वीस फुटांवर वाघ दोन्ही बाजूंनी मृत्यूने आमंत्रण दिले होते. अशा परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी तिने नाल्यातील पाण्यामध्ये उडी मारली. कशीबशी दुसऱ्या थळीला जाऊन पोहोचली. याचवेळी सोबत असलेल्या बकऱ्यांवर वाघाने हल्ला केला. यामध्ये एक बकरी ठार झाली तर दुसरी जखमी झाली. तिने काही अंतरावरील गुराख्याला सर्व प्रकार सांगितला. त्याने गावातील नागरिकांना माहिती दिली. नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिला सावरत गावात आणले. या घटनेमुळे मात्र गावात वाघाची दहशत पसरली आहे.