ब्रह्मपुरी :- मागील काही दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यातील हत्तीलेंडा, सायघाटा, दुधवाही, अड्याळ या परिसरात वाघांचा वावर वाढला होता. शेतशिवारांमध्ये, रस्त्यावर हे वाघ नागरिकांना दिसत होते. या वाघांनी मागील काही दिवसात काही नागरिकांना ठार केले व काहींना जखमी केले. दोन दिवस आधी हत्तीलेंडा परिसरात वाघाने एका इसमाची शिकार केली व एकाला जखमी केले. यानंतर तात्काळ क्षेत्राचे खासदार अशोक नेते व ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी येथील वनविभागाच्या कार्यालयात उपवनसंरक्षक यांची भेट घेतली होती. यावेळी वाघाला जेरबंद करण्याची मागणी दोघांच्या वतीने करण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक श्री. मल्होत्रा यांच्याकडून सकारात्मक कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते.
काल ही अड्याळ येथे वाघाने एका युवकाला ठार केले. वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच माजी आमदार प्रा. देशकर यांनी राज्याचे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत फोनवर चर्चा करून सदर वाघाला जेरबंद करण्याची विनंती केली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वनविभागाला ताबडतोब वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश दिले व आज सकाळी वाघाला जेरबंद करण्यात आले. यासोबतच दुसऱ्या वाघालाही लवकरच जेरबंद करू असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जर बंद करण्याचे दिलेले निर्देश नागरिकांना भयमुक्त करणारा आहे.
ही कारवाई दिपेश मल्होत्रा- उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनाखाली एम.बी.चोपडे, सहायक वनसंरक्षक ब्रह्मपुरी, आर.डी. रोडे, वनक्षेत्रपाल उत्तर ब्रह्मपुरी, राकेश आहुजा, ( बायोलॉजिस्ट ब्रह्मपुरी), वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी , कर्मचारी यांच्या पथकाने केली.