गडचिरोली ( Gadchiroli Flood 2022 ) : गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट झोन दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी (Godavari ) आणि प्राणहिता (Pranhita ) नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाने आपतकालीन इशारा दिला असून सिरोंचा (Sironcha ) तालुक्यातील 12 गावे ताबडतोब खाली करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती बघता प्रशासनाच्या वतीने नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. आलापल्लीत ढगफुटी सदृश विक्रमी पाऊस पडल्याने अनेकांना स्थलांतरीत करण्यात आले.
मुसळधार पावसाने सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नदीमधील पाण्याची पातळी वाढत असल्याचे काही गावामध्ये पूरस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सिरोंचा रै ( छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दिकुंठा, जानमपल्ली वे. लँ., मृदुक्रिष्णापुर, आयपेठा रै, सोमनूर माल अंशतः, नडिकूडा, कोत्तूर रै, असरअल्ली अंशतः, अंकिसा कंबाल पेठा टोला अंशत: या गावांना पोलीस व प्रशासन संबंधित गावात जाऊन नागरिकांना 12 गावे खाली करण्यास सांगत आहेत. याव्यतिरीक्त आवश्यक इतर गावांसाठी प्रशासन परिस्थिती पाहून निर्णय घेवू शकते अशी माहिती आहे. असे प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे.